युपी निवडणूक- आयोगाने नेमून दिले, खर्चाचे, वस्तूंचे दर
उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवार खर्चाबाबत अतिशय सतर्क राहण्याचे आदेश सर्व जिल्हा निर्वाचन अधिकार्यांना दिले आहेत. उमेदवाराची खर्च मर्यादा ठरविली गेली असतानाच विविध वस्तूंसाठी कसे दर धरले जाणार याची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या दरानुसार उमेदवाराला खर्चाचा हिशोब आयोगाला द्यावा लागणार आहे. दिल्ली जवळच्या नोयडा आणि गाझियाबाद साठीच्या दरांची यादी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार नोयडा येथे चहा १० रु. कॉफी १५ रुपये तर गाझियाबाद साठी चहा ७ रू.आणि कॉफी १० रुपये आहे. यावेळच्या खर्चात करोना गाईडलाईननुसार पाळावयाच्या नियमांचा समावेश केला गेला आहे.
उमेदवाराने होम हवन पूजा केली तर ११०० रु, एलसीडी २१०० रु, फेस मास्क तीन लेअर २००, सॅनिटायझर १० ते ६०० रु, लिक्विड सोप ५५, फेस शिल्ड ३०, प्लास्टिक कागद ६० पैसे, रबर सर्जिकल ६ रु, थर्मल स्कॅनर ९७३ रु, कापडी फलक ३५०, झेंडा १२ ते २८ रुपये, पोस्टर १३८० ते २५०० रुपये, खुर्च्या प्र.दिवस ७ ते १२ रु, सोफा ५० ते ७५, गाद्या रोज १० रु, ढोल रोज ४०० रुपये, बाईक, स्कुटी रोज ३०० तर कार रोज ३ हजार ते ३२०० रुपये असे दर धरले जाणार आहेत.
सामोसा १० रुपये,पुरी भाजी ३० रुपये, लंच ७५ ते १०० रुपये, उदबत्ती १० रुपये, नारळ २० रुपये, तोंड गोड करण्यासाठी मिठाई ४०० ते ७५० रुपये किलो, लाडू २०० रुपये, गायक गायिका रोज ४ हजार रुपये तर हॉटेल रूम साठी रोज ११५० ते ४६०० रुपये अश्या दराने उमेदवारास निवडणूक खर्च हिशोब द्यावा लागणार आहे.