भारतीय सेना दिवस, जेसलमेर मध्ये फडकला सर्वात मोठा तिरंगा

भारतीय सेनेचा ७४ वा सेना दिवस आज देशभर साजरा होत आहे. १९४९ मध्ये फिल्ड मार्शल जनरल करीअप्पा भारताचे पहिले सेनाध्यक्ष बनले त्या निमित्ताने दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. सेना जवानांची बहादुरी, वीरता, बलिदान यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा होतो तसेच शहीद झालेल्या सैनिकांना या दिवशी श्रद्धांजली दिली जाते. या निमित्ताने परेड, प्रदर्शन आणि अन्य अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

आज दिल्लीच्या करीअप्पा परेड ग्राउंडवर थलसेना प्रमुख जनरल एम एम नरवणे सलामी स्वीकारणार आहेत. परेड मध्ये यावेळी प्रथमच जवानांच्या नव्या कॉम्बॅट गणवेशाचे दर्शन होणार आहे. डिजिटल पॅटर्न मधील हे गणवेश आरामदायी आणि टिकावू आहेत. या परेड मध्ये प्रथमच सैनिक विविध वेळचे गणवेश आणि शस्त्रे घेऊन परेड करत आहेत.

आज जगातला सर्वात मोठा तिरंगा राजस्थान, जेसलमेर मध्ये फडकविला जात आहे. २२५ फुट लांब आणि १५० फुट रुंद हा तिरंगा १ हजार किलो वजनाचा आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित तो बनविला असून सेना वॉर म्युझियम पहाडावर हा तिरंगा फडकाविला जात आहे.