जागतिक आरोग्य संघटनेची कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला परवानगी


वॉशिंग्टन – जगभरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे अजूनही नाव घेत नाही. त्यातच ओमिक्रॉनबाधितांची संख्या देखील वाढू लागली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कोरोनावरील उपचारांसाठी नव्या औषधाला मान्यता देण्यात आली आहे. एलि लिली आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाईन यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या बारिसिटिनिब या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. ओल्युमियांट या नावाने हे औषध उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाची शिफारस केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या आकडेवारीनुसार आता जगभरातील १४९ देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. अनेक देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने डेल्टा व्हेरिएंटची जागा घेऊ लागला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेथील सरकारांनी बुस्टर डोस, टेस्टिंग आणि उपचारांमध्ये वाढ केली आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीने लिलिच्या बॅरिसिटिनिब औषधाला मान्यता दिली आहे.

कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाच Olumiant या नावाखाली उपलब्ध असलेले हे औषध देता येऊ शकेल. तसेच, कॉर्टिकोस्टेरॉईडसोबतच हे औषध देता येऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये सविस्तर माहिती देतानाच आवश्यक त्या नियमावली देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने ओल्युमियांटसोबतच जीएसके-वीर कंपनीच्या मोनोक्लोनल अँटिबॉडी थेरपीचाही सल्ला दिला आहे. पण, ओल्युमियांटपेक्षा ही थेरपी कमी प्रमाणात परिणामकारक ठरत असल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित देशांनी या दोन्ही उपचार पद्धतींविषयी निर्णय घ्यायचा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.