दारु पार्टी बोरिस जॉन्सन यांना महागात पडणार? भारतीय वंशाचा ‘हा’ नेता होऊ शकतो ब्रिटनचा पंतप्रधान


लंडन – सध्या ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. देशात सन २०२० मध्ये कोरोना निर्बंध लागू केलेले असताना त्यांनी डाउनिंग स्ट्रीट येथील गार्डनमध्ये आपल्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांसोबत पार्टी केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर जॉन्सन यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसत आहे. विरोधी पक्षाने पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. दरम्यान ब्रिटनमधील एक प्रमुख सट्टा कंपनी असणाऱ्या ‘बेटफेअर’ने केलेल्या दाव्यानुसार या नवीन वादात अडकलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यानंतर भारतीय वंशाचे मंत्री ऋषि सुनक हे पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात.

यासंदर्भात ‘बेटफेअर’ने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान कार्यालयातील डाउनिंग स्ट्रीटमध्ये मे २०२० मध्ये कोरोना लॉकडाउनच्या कालावधीत झालेल्या ड्रिंक पार्टीसंदर्भात समोर आल्लेल्या माहितीनंतर बोरिस जॉन्सन अडचणीत आले आहेत. विरोधी पक्षाबरोबरच स्वपक्षीय नेत्यांकडूनही ५७ वर्षीय बोरिस जॉन्सन यांना विरोध केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना पंतप्रधान केले जाऊ शकते, अशा चर्चा ब्रिटनच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

विरोधीपक्षाबरोबरच त्यांच्या पक्षाचे नेतेही दबक्या आवाजात जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. ‘बेटफेअर’च्या सॅम रॉसबॉटम यांनी ‘वेल्स ऑनलाइन’ला दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन यांना हटवण्यात आल्यास ४१ वर्षीय ऋषि सुनक यांना पंतप्रधान बनवले जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. सुनक यांच्या खालोखाल परराष्ट्र मंत्री लिज ट्रूस आणि कॅबिनेट मंत्री मायकल गोव यांच्या नावांचाही पंतप्रधान पदासाठी विचार होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. तसेच या शर्यतीमध्ये माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रीति पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ओलीवर डॉउडेन यांचाही समावेश आहे.

या प्रकरणासंदर्भात बोरिस जॉन्सन यांनी याआधीच माफी मागितली आहे. पण त्यापूर्वी जेव्हा हे प्रकरण समोर आले, तेव्हा त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. नंतर त्यांनी या पार्टीत आपण हजर असल्याचे मान्य केले होते. अखेर त्यांनी ही पार्टी म्हणजे आपल्या कार्यालयीन कामाचा भाग असल्याने आपण तिथे उपस्थित राहिलो होतो, अशी सारवासारव केली. ब्रिटनच्या राजकीय वर्तुळाबरोबरच प्रसारमाध्यमांमध्ये मागील काही दिवसांमध्ये या प्रकरणाची तुफान चर्चा आहे. आधी नकार आणि नंतर थेट माफी यामुळे आता या प्रकरणावरुन पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे.