तिसरा आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने ७ गडी राखून जिंकला


नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेने तिसरा आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला. दक्षिण अफ्रिकेसमोर भारताने विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण अफ्रिकेने हे आव्हान ३ गडी गमावून पूर्ण केले. दक्षिण अफ्रिकेने या विजयासह ही मालिका २-१ ने जिंकली आहे.

कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचे दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमावून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवले होते.

२२ चेंडूत १६ धावा करून एडन मारक्रमने बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसनने मोर्चा सांभाळला. पण बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून तंबूत परतला. किगन आणि दुस्सेनने तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. पण ८२ धावांवर असताना किगन शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीने विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद ४१ आणि टेम्बा बवुमा नाबाद ३२ धावा केल्या.