ठाकरे सरकारने कोट्यावधीचा दंड माफ केल्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया


मुंबई – बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. ठाणे महानगरपालिकेने पोखरण रोड क्रमांक एक येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलातील अनधिकृत बांधकामासाठी ठोठावलेला दंड व त्यावरील व्याज वित्त विभागाचा विरोध डावलून माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे ४ कोटी ३३ लाख ९७ हजारांची सरनाईक यांना पाठवलेली नोटीस रद्द होणार आहे. दरम्यान या मुद्द्यावरुन विरोधक टीका करत असून वाद निर्माण झाला आहे. यानंतर पहिल्यांदाच प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त आर ए राजीव यांच्यावर प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी सुडबुद्धीने ही ‘छाबय्या विहंग गार्डन या गृहसंकुलातील बांधकाम अनधिकृत ठरवल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तांत्रिक बाजू ग्राह्य धरुन जाता जाता त्यांनी या इमारतीची जी मंजूर फाईल होती, त्यावर ताशेरे ओढले, असे ते म्हणाले. तसेच एक इंचही बांधकाम अनधिकृत ठरल, तर आमदारकीचा राजीनामा देईन, असेही म्हटले आहे.

नंदकुमार जंत्रेंची बदली झाली आणि त्यानंतर पालिकेत आर एर राजीव नावाचे आयुक्त आले. त्यांनी आल्यानंतर शिवसेनेच्या विरोधातील भूमिका घेतली, असा आरोप यावेळी प्रताप सरनाईक यांनी केला. ते पुढे म्हणाले की, शिवसेनेचे मागासवर्गीय असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्याची नोटीस त्यांनी काढली. त्यावेळी सर्वात प्रथम प्रताप सरनाईकने त्यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. तेव्हापासून प्रताप सरनाईक आणि आर ए राजीव यांच्यात युद्ध सुरु झाले.

त्यानंतर ज्या व्यायामशाळेत मी व्यायाम करतो, तेथील फोटो काढून पेपरला देणे, त्या विकासकाला नोटीस काढणे. विहंग हॉटेलच्या बाहेर जनरेटर ठेवले होते, तेव्हा माझी पत्नी आणि मुलगा नगरसेवक असताना ते का ठेवले यासाठी नोटीस काढत नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई सुरु केली. एखाद्या अय्य़ाश अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत केलेल्या अनेक गोष्टी आहेत. आमदार नात्याने मी शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पाठीशी उभा राहिलो म्हणून माझ्याविरोधात कारवाया सुरु केल्या, असा आरोपही यावेळी त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, त्यातच एक अशी परिस्थिती निर्माण झाली की, ही इमारत विकसित करत असताना सात माळ्याची इमारत पूर्ण झाली होती. पाच माळ्याचा टीडीआर शिल्लक होता. महापालिकेची शाळा बांधून दिली होती, पण जाणुनबुजून ती हस्तांतरित करण्यात आली नाही. तांत्रिक बाजू ग्राह्य धरुन बदली झाल्यानंतर जाता जाता त्यांनी या इमारतीची जी मंजूर फाईल होती, त्यावर ताशेरे ओढले.

नगरविकास खाते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना विहंग गार्डनमध्ये कोणतेही अनधिकृत बांधकाम झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. महापालिका स्तरावर निर्णय घ्या, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे किरीट सोमय्या आणि भाजपा नेत्यांनी अभ्यास करुन बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी महाविकास आघाडीतील एका मंत्र्याने जाणीपूर्वक विषय मंत्रिमंडळ बैठकीत येण्याआधी वृत्तवाहिनीला बातमी दिली, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला. पण त्यालाही न जुमानता हे प्रकरण मंजूर केल्याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचे आभार मानतो, असेही सांगितले. आपण शिवसेना आमदार आणि मराठी उद्योजक असल्यामुळे जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचेही ते म्हणाले आहेत.

ठाणे महानगरपालिकेने विकासक प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल ३ कोटी ३३ लाखांचा दंड ठोठावला होता. यापैकी २५ लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित ३ कोटी आठ लाखांची दंडाची रक्कम व त्यावर १८ टक्के दराने व्याजाची रक्कम १ कोटी २५ लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून येणे बाकी आहे. ही रक्कम २१ कोटी होते, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आहे. ही दंडाची रक्कम वित्त विभागाने माफ करू नये, असे स्पष्टपणे मंत्रिमंडळाला सादर केलेल्या टिप्पणीत नमूद केल़े, तरीही मंत्रिमंडळाने दंडाची रक्कम माफ करण्यास मान्यता दिली.

जून २०१४ मध्ये सरनाईक यांनी दंड व त्यावरील व्याज माफ करण्यात यावे म्हणून राज्य शासनाला विनंती केली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामाविरोधात नगरविकास विभाग आणि लोकायुक्तांकडे तक्रार करीत सरनाईक यांच्यावर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण सध्या लोकायुक्तांपुढे असून त्यांनीही बांधकामावर कारवाईचे आदेश दिल्याचा दावा सोमय्या यांचा आहे.