काल दिवसभरात अडीच लाखाहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 315 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनासोबतच ओमिक्रॉनबाधितांची देखील संख्या वाढत आहेत. काल दिवसभरात देशात 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तर काल दिवसभरात 315 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोनाबाधितांमध्ये 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. देशात सध्या कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 14.78 टक्के आहे.

दरम्यान, काल दिवसभरात देशात कोरोनाचे 2 लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये आज 16 हजार 785 रुग्णांची वाढ झाली आहे. म्हणजे दिवसेंदिवस कोरोनाबाधित वाढतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ही 12 लाख 72 हजार 73 एवढी झाली आहे. तर 4 लाख 85 हजार 350 जणांनी आपला जीव आत्तापर्यंत कोरोनामुळे गमावला आहे. तर आत्तापर्यंत 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर काल दिवसभरात 1 लाख 9 हजार 345 बाधित कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात सध्या लसीकरण मोहिमेने देखील वेगाने सुरू आहे. अद्याप ज्या लोकांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घेण्याचे आवाहन केंद्र सरकारकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात 155 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. देशात काल दिवसभरात 73 लाख 8 हजार 669 लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 155 कोटी 39 लाख 81 हजार 819 लसींचे डोस देण्यात आले आहेत.

तर दिवसेंदिवस ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचे दिसत आहे. देशात आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 5 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. देशातील जवळपास 27 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर त्यापाठोपाठ दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.