ब्रेकअपच्या चर्चा ऐकून संतापली मलायका अरोरा


आपल्या करिअरपेक्षा खासगी आयुष्यामुळेच अभिनेत्री मलायका अरोरा जास्त चर्चेत असते. अभिनेता अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत मलायका रिलेशनशिपमध्ये आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा होताना दिसते. मलायका आणि अर्जुन यांचे ब्रेकअप झाल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वीच पसरल्या होत्या. यावर मलायका अरोराने प्रतिक्रया दिली आहे. सोशल मीडियावर मलायकाने पोस्ट शेअर केली आहे, ज्यांचा संबंध त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांशी जोडला जात आहे.

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत मलायका अरोराने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने अशाप्रकारच्या ब्रेकअपच्या चर्चांवर राग व्यक्त केला आहे. तिने लिहिले, तुम्हाला जर वयाच्या ४० वर्षी प्रेम मिळाले, तर ही सामान्य गोष्ट असल्याचे समजायला हवे. जर तुम्ही वयाच्या ३० वर्षी नवी स्वप्न पाहत असाल आणि ती पूर्ण करण्याची तयारी ठेवत असाल तर यात नवीन काहीच नाही आणि वयाच्या ५० व्या वर्षीही तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्देश शोधू शकता. तुमचे आयुष्य २५ व्या वर्षी संपत नसल्यामुळे असे वागणं बंद करा आणि स्वतःचे विचार बदला.

दरम्यान सोशल मीडियावर मलायकासाठी अर्जुन कपूरने पोस्ट शेअर करत त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मलायकासोबतचा एक मिरर सेल्फी त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, ‘अफवांना जागा नाही. सुरक्षित रहा, आनंदी रहा, खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना खूप प्रेम…’ त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरलही झाली होती. विशेष म्हणजे अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मलायका अरोरानेही कमेंट केली होती. कमेंट करताना तिने काहीही न लिहिता फक्त हार्ट इमोजी शेअर केला होता.

दरम्यान सोशल मीडियावर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नात्याची नेहमीच चर्चेत असते. दोघेही नेहमीच सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांना सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल केले जाते. मलायका अरोरा अर्जुन कपूरपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे हे दोघेही जेव्हा सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात तेव्हा त्यांना ट्रोल केले जाते. पण मलायका अर्जुन अशा ट्रोलिंगकडे नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतात.