मालिकेतून काढून टाकल्यामुळे अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्यांना किरण मानेंचे उत्तर


एका महिलेने माझ्या राजकीय पोस्ट संदर्भात तक्रार केली होती, त्यावरुन नाराजी दर्शवत मला मालिकेतून काढण्यात आल्याची माहिती अभिनेते किरण माने यांनी दिली आहे. अभिनेते किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमधून काढून टाकण्यात आले आहे. राजकीय भूमिका घेत असल्याचे विचित्र कारण देत ही कारवाई करण्यात आली आहे. पण आपल्याला फरक पडत नसल्याचे सांगत किरण मानेंनी कोणी पाठिंबा दिला नाही, तरी मी ही लढाई एकटा लढेन, असे म्हटले आहे.

नेत्यांबद्दल चांगली पोस्ट केल्यावर, त्या पक्षाचा झालो असे नसते. सजग नागरिकाचे सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हे कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नका, लिहू नका असे सांगणे अयोग्य आहे, असे मला वाटते,अशा शब्दांमध्ये किरण माने यांनी घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे सांगतानाच आपण आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे म्हटले आहे.

कोणी पाठिशी उभं राहिलं नाही तरी मी एकटा लढणार आहे. कोणत्याही सरकारविरोधात बोलणे, पोस्ट करणे हा माझा अधिकार आहे. तंत्रज्ञानाचा वापर नागरिकांच्या सोयीसाठी होणे आवश्यक असल्याचे म्हणत किरण मानेंनी आपल्या पोस्ट या सर्वच पक्षांविरोधात असतात, असे सांगितले आहे.

अश्लील भाषेत मला ट्रोल केले जात आहे. मला कामावरुन काढून टाकले, तर मी खचलो आहे, असे त्यांना वाटत आहे. माझ्या पोस्ट खालच्या कमेंट वाचा. हा विखार, ही विषारी भाषा दिवसोंदिवस वाढत चाललेली आहे. याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. नाहीतर अराजक माजेल. तुमचे जगणे मुश्किल होईल. आता कसे पाठिशी उभे राहायचे, हे तुमचे तुम्ही ठरवा. हे तुमच्या हातात आहे. पण मी झालेला लढा सुरु ठेवणार, मी लढत राहणार. यात माझा जीव गेला, बदनामी झाली तरी हरकत नाही, असे किरण माने म्हणाले.

आता मला बदनाम करायचाही प्रयत्न होणार. बदनामी हे त्यांचे मोठे शस्त्र आहे. खोटे आरोप करुन माणसाला बदनाम करणे यात त्यांचा हातखंड आहे. माणसाला बदनाम करायचे, त्याला वेड्यात काढायचे. हे सारे फोफावतं चालले आहे. आपण साऱ्यांनी विचार करुन त्याला आळा घातला पाहिजे, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

मला म्हणतात की केंद्र सरकारच्या विरोधात तुम्ही आहात. एसटी संपाच्या वेळी मी एसटी कामगारांच्या बाजूने पाठिंबा देणारी पोस्ट लिहिली. ती तुम्ही वाचू शकता. पब्लिक पोस्ट असतात माझ्या. राज्य सरकारच्या बाजूने मी असतो तर ती पोस्ट कशी लिहिली असती? सरकार कोणाचेही आले तरी मी त्यावर जाब विचारत राहणार कारण हा माझा अधिकार असल्याचे स्पष्ट शब्दांमध्ये किरण मानेंनी आपली भूमिका मांडली आहे.

मला काही जण कलाकाराने राजकारणावर बोलू नये, असे सुचवतात. तर का बोलू नये कलाकाराने असा माझा प्रश्न असल्याचेही किरण माने म्हणाले. मी एक किरण माने म्हणेल की जा मला नाही फरक पडत. पण अनेक लोक असे आहेत की ज्यांचे पोट त्याच्यावर आहे. ते लोक घाबरतात, असे किरण माने यांनी म्हटले आहे. तसेच, मला चॅनेलवर पण आक्षेप नाही. त्यांच्यावर कोणीतरी दबाव आणला आहे. या दबावावर पण उत्तर देऊया जेणेकरुन या सगळ्याचा पुन्हा विचार केला जाईल, असे मत किरण मानेंनी मांडले आहे.