हरिद्वारमधील धर्मसंसदेतील द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी जितेंद्र सिंह त्यागींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या


देहरादून – उत्तराखंड पोलिसांनी हरिद्वारममध्ये द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पहिली अटक केली आहे. जितेंद्र सिंह त्यागीला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान अटकेची कारवाई केल्यानंतर यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सर्व मरणार अशा शब्दांत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला आहे. यती नरसिंहानंद द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात आरोपी आहेत. यती नरसिंहानंद यांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिमांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती.

त्यागीला पोलिसांनी अटक केली असून ही पहिलीच अटक आहे. याआधी त्यागीला वसीम रिझवी नावाने ओळखले जात होते. दरम्यान उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी यती नरसिंहानंद आणि साध्वी अन्नपूर्णा यांना हजर होण्यासाठी नोटीस बजावली आहे.

पोलीस अधिकारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यागीला ताब्यात घेत असताना यती नरसिंहानंद यांना सहकार्यासाठी विनंती करत असल्याचे दिसत आहे. कारमध्ये बसलेले त्यागी पोलिसांना तुम्ही त्यागीला अटक का करत आहात? अशी विचारणा करत असल्याचे दिसत आहे. यावेळी अधिकारी गुन्हा दाखल झाल्याने अटक करणे गरजेचे असल्याचे समजावून सांगताना दिसत आहेत.

त्या तीन प्रकरणांमध्ये त्याच्यासोबत मीदेखील आहे. त्याने हे एकट्यानेच केले का?, अशी विचारणा यती नरसिंहानंद यावेळी पोलिसांना करताना दिसत आहेत. यावेळी पोलीस अधिकारी यती नरसिंहानंद यांना कारमधून बाहेर यावे, जेणेकरुन पुढील प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी विनंती करतात. पण यती नरसिंहानंद मागे हटण्यास तयार होत नाहीत. अधिकारी यावेळी, त्यागींना परिस्थिती समजत आहे, असे सांगतात त्यावेळी यती नरसिंहानंद म्हणतात, पण मी नाही…आमचा पाठिंबा असल्यानेच ते हिंदू झाले आहेत.

मुस्लीम धर्म सोडत उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी जितेंद्र सिंह नारायण त्यागी हे नवे नाव स्वीकाराले आहे. गाझियाबादमधील दासना देवी मंदिराचे प्रमुख पुजारी असणारे यती नरसिंहानंद यांनी त्यांच्या धर्मातराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी याआधीही अशा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

यावेळी पोलिसांना यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सगळे मरणार, तुमची मुलेही, असे म्हणत संताप व्यक्त केला. त्यागीला रुकरी येथून अटक करण्यात आला. द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी यती नरसिंहानंद, त्यागी, अन्नपूर्णा यांच्यासहित १० जणांची नावे एफआयआरमध्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तराखंड सरकारला याप्रकरणी १० दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर करण्यात आलेली ही पहिली अटक आहे.