यापुढे आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग बंधनकारक – नितीन गडकरी


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. 6 एअरबॅग आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांनी एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत दिली आहे.

गडकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, हा निर्णय आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. याआधीच केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.

चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितता एअरबॅग नियमांमुळे अधिक चांगली होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

एअरबॅग्सची संख्या वाढली तर कारची किंमत प्रति एअरबॅग 3,000 ते 4,000 रुपयांनी वाढेल. पण रस्ते अपघात झाल्यास आपल्या देशातील गरिबांनाही संरक्षण मिळाले पाहिजे. एका अहवालानुसार, मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी चार एअर बॅग्स लावल्या, तर किंमत फक्त ८ ते ९ हजारांनी वाढेल. एअर बॅग्सची किंमत १८०० रुपये आहे आणि त्याचे मॉडिफिकेशन करण्यासाठी ५०० रुपयांचा खर्च येईल. यात मजुरी आणि महागाई दरही आहे. दुसरीकडे, कंपनी उत्पादकांच्या मते एअरबॅग्स दिल्यास गाड्यांची किंमत ३० हजारांनी वाढेल.