अखेर महेश मांजरेकरांनी चित्रपटातील ‘ती’ वादग्रस्त दृश्य काढली!


दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. यासंदर्भात खुद्द महेश मांजरेकर यांनीच जाहीर निवेदन दिले आहे. महेश मांजरेकरांनी यामध्ये आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, ती दृश्य, तसेच रिलीज करण्यात आलेला ट्रेलर देखील काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. तसेच, लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पूर्ण चित्रपट पाहावा आणि आपला अभिप्राय कळवावा, असे देखील या निवेदनात मांजरेकरांनी म्हटले आहे.

आपला कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे मांजरेकर या निवेदनात म्हटले आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. १८ वर्ष वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच हा चित्रपट असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला, तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आक्षेप घेण्यात आलेला ट्रेलर सोशल मीडियातून काढून टाकल्याचे मांजरेकरांनी या निवेदनात जाहीर केले आहे. आम्ही समाजातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखत नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी दृश्य काढून टाकली आहेत. ज्या सोशल मीडिया प्लॅटफर्म्सवर नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाचा जुना ट्रेलर रिलीज करण्यात आला होता, त्या सर्व ठिकाणांहूनही काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात येत आहे. जुना प्रोमो त्वरित काढून नवीन रिलीज करण्याच्या सूचनाही संबंधित माध्यमांना करण्यात आल्या आहेत.

तमाम स्त्रियांचा चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेपासून लेखक-दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्वजण मनापासून आदर करतो. समाजातील सर्व महिलांबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा संदेश समाजामध्ये जाणार नाही, याचा कटाक्षाने प्रयत्न करण्यात आला आहे. असे असले, तरी नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या प्रोमोधील काही दृश्यांतून कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. केवळ प्रोमोमधूनच नव्हे, तर मुख्य चित्रपटातूनही आक्षेपार्ह वाटणारी दृश्य वगळण्यात आली आहेत. सेन्सॉरने ए सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्य संवेदनशील वाटतात आणि भविष्यात ज्याचा त्रास होऊ शकतो असे वाटते, ती दृश्य आम्ही चित्रपटातूनही वगळत आहोत, असे या निवेदनात ते म्हणाले आहेत.

ज्याक्षणी नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाची प्रसिद्धी सुरू करण्यात आली, त्या क्षणापासून हा चित्रपट केवळ प्रौढांसाठीच असल्याचे आम्ही प्रत्येक वेळी सांगितले आहे. तशा आशयाची ओळही चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिण्यात आली आहे. अठरा वर्षांखालील प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी येऊ नये, याची आम्ही योग्य ती काळजी घेतली आहे. यात दाखवण्यात आलेली वास्तवता पाहण्यास सक्षम आहेत, यातील दृश्यांचे गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, यातील दाहकता सहन करू शकतात अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पाहावा अशी विनंतीही आम्ही सातत्याने केली आहे. हा चित्रपट विषयाच्या दृष्टीने थोडासा जड असून सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याची माहितीही आम्ही देत आलो असल्याचे मांजरेकरांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पूर्ण चित्रपट प्रेक्षकांनी पाहिल्यानंतर त्यांचा अभिप्राय कळवावा, अशी अपेक्षा मांजरेकरांनी या निवेदनाच्या शेवटी व्यक्त केली आहे. मुंबईत तीन दशकांपूर्वी उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातील दाहकता दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. तरीही काही गोष्टी काहींना सहन करणे किंवा बघणे चुकीचे वाटत असेल, त्यांच्यासाठी ही दृश्ये चित्रपटातूनही पूर्णपणे काढण्यात आली आहेत. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या माध्यमातून एक वास्तववादी चित्रपट आपल्या भेटीला आणला आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा. चित्रपट पूर्ण पाहिल्यावर आपला अभिप्राय कळवावा, असे या निवेदनात म्हटले आहे.