उपमुख्यमंत्र्यांच्या फोन नंबरचा वापर करुन पुण्यातील बड्या बिल्डरला धमकी; 6 जणांना अटक


पुणे – आजवर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार आपण ऐकले असतील, पण पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकाला चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला फोन करत त्याच्याकडे 20 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.

सहा जणांना वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने केली. त्याचबरोबर वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्यासाठी धमकी देखील देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बांधकाम व्यावसायिकाने याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. सदर आरोपी ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून बिल्डरला फोन करायचे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचे सांगण्यात आले.

नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप अटकेत असलेल्या आरोपींनी संगणमत करून डाऊनलोड केले. त्यांनी अॅपच्या मदतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकचा वापर करून बांधकाम व्यवसायिक आला फोन केला आणि अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचे सांगून वीस लाख रुपयांची मागणी केली. तसेच वाडेबोल्हाई येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका, असे सांगितले होते. दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आहे.