पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, चंद्रकांत पाटलांनी साधला निशाणा


कोल्हापूर – आज माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधल्याचे दिसून आले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अन्य कुणाकडे सोपवण्याची ही वेळ असल्याचही चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले.

चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, भारतीय संस्कृतीमध्ये एकमेकांच्या तब्येतीवर टीका टिप्पणी करणे नाही, कारण तो विषय त्या माणसाच्या हातामध्ये नसतो. किंबहुना शत्रू जरी असेल, उद्धव ठाकरे तर आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असला तरी त्याच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण खूप विषय महाराष्ट्रासारख्या १२ कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती, तुम्ही टोपेंना पाठवले, दिलीप वळसेंना पाठवले.

देशाच्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असताना, आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण जर तेच तुम्ही असता, तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील असल्यामुळे चारवेळा बैठकीत मोदी विचारत असतात, उद्धव ठाकरे तुमचे काय मत आहे. पण तुम्ही तब्येतीमुळे नाही जाऊ शकलात आणि तब्येतीची हेळसांड देखील करू नये. परंतु, राज्याच्या हितासाठी अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. पंतप्रधान मोदींचे देखील हेच म्हणणं आहे की पोटावर पाय आणून निर्बंध लादू नका.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतात, वैगरे हे पुरत नाही. मग सगळ्या मुख्यमंत्र्यांनी तसच केले असते. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असे आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे.

तसेच, तुमच्या तब्यतीबाबत मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की लवकर हे बरे व्हावेत. पण तोपर्यंत कोणीतरी तुमच्यावतीने मुख्यमंत्री म्हणून… कारण मुख्यमंत्री या शब्दात अर्थ आहे. मुख्यमंत्री या शब्दात ताकद असल्यामुळे तो लागेल आणि तो कोण असेल ते तुम्हीच ठरवायचे असल्याचेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले.

त्याचबरोबर, काल मुंबै जिल्हा बँकेची निवडणूक झाली, महाविकास आघाडीने चेअरमनशिप एकत्र लढवायची ठरवली. बँकांमध्ये पक्ष नसतात. मुंबै बँकेत देखील सगळ्यांनी मिळून बिनविरोध केली आणि मग दबावाने त्यामधील जे कलरवाले आहेत, यांनी वेगळा चेअरमन उभा केला. चला राष्ट्रवादीने चेअरनमन पदरात पाडून घेतला, शिवसेनेचा व्हाईस चेअरमन पडला? हे कसे झाले? आता हे शिवसेनेला हे कळत नाही की तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फसत चालला आहात.

तुम्ही आता गोवा, उत्तर प्रदेशमध्ये शरद पवारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन चालले आहेत. त्यांना असे तोंड फोडून घेण्याची सवयच आहे, गेले डिपॉझिट जप्त झाले. त्यांची त्यानिमित्त वेगवेगळ्या राज्यात मत वाढतात, एक अखिल भारतीय पक्ष व्हायला एक किमान मतदरांची संख्या लागते, तुम्ही का सगळ्या ठिकाणी तुमचेही तोंड फोडून घेतात? हा प्रश्न आहे. तोंड फोडून घेणे म्हणजे पराभव, पडणे, डिपॉझिट जप्त होणे, असेही यावेळी शिवसेनेला उद्येशून चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.