लोम्बार्गिनीने नोंदविले विक्रीचे रेकॉर्ड
इटलीची जगप्रसिद्ध लग्झरी स्पोर्ट्स कार व एसयुव्ही उत्पादक लोकप्रिय कंपनी ऑटोमोबिल लोम्बार्गिनीने गेल्या म्हणजे २०२१ मध्ये कंपनीच्या ५९ वर्षाच्या इतिहासात नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. गतवर्षात कंपनीने तब्बल ८४०५ कार्स आणि एसयूवी विकून विक्रीचे नवे रेकॉर्ड केले. २०२० च्या तुलनेत हि विक्री १३ टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे कंपनीची युरूस सर्वाधिक विकली गेली आहे.
वोक्सवॅगनच्या स्वामित्वाखालील लोम्बार्गिनीने गतवर्षात जगभरात ५०२१ युरूस कार्स डिलिव्हर केल्या. एकूण विक्रीत हे प्रमाण ६० टक्के आहे. कंपनीच्या सुपर एसयूव्हीला जगभरात तसेच भारतात सुद्धा चांगली मागणी आहे. लोम्बार्गिनीने हुराकेनची २५८६ युनिट, अॅव्हेंडॉरची ७९८ विकली आहेत. गेल्या वर्षी कंपनीने तीन नव्या सुपरकार सादर केल्या होत्या. हुराकेन सुपर ट्रोफीओ ओमोलोगाटा, एव्हेंडॉर अल्टीमेट आणि कॉन्टॅक्ट एलपीआय ८००-४ अशी ही मॉडेल्स आहेत.
लोम्बार्गिनीला अमेरिकेत सर्वात मोठा बाजार असून गेल्या वर्षी या बाजारात कंपनीने २४७२ कार्स विकल्या. चीन बाजारात ९३५. जर्मनी मध्ये ७.६, युके मध्ये ५६४ तर इटली मध्ये ३५९ कार्स विकल्या गेल्या.भारतात सुद्धा लोम्बार्गिनीची बाजारपेठ वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे.