उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत बॉलीवूडची एन्ट्री

उत्तरप्रदेश विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात व्यग्र झाले असतानाच बॉलीवूडची एन्ट्री झाली आहे. म्हणजे सध्या तरी बॉलीवूड मधील दोन कलाकार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. कॉंग्रेस तर्फे बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी ‘मिस बिकिनी, इंडिया’ अर्चना गौतम हस्तिनापुर येथून रिंगणात उतरली आहे. या २६ वर्षीय अभिनेत्रीला राजकारणाचा काहीही अनुभव नाही असे ती सांगते आणि तीच तिची जमेची बाजू असल्याचे दावा करते.

अर्चनाने जर्नालिझम मधील पदवी घेतली असून मलेशिया मध्ये मिस बिकिनी वर्ल्ड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रियांका गांधी यांच्या ‘लडकी हूँ. लड सकती हूँ’ नारा तिला आवडला आहे. प्रियांका गांधी यांना टीव्ही वर पहिल्यावर राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतल्याचे ती सांगते. तिचे दोन चित्रपट २८ जानेवारीला प्रदर्शित होत आहेत. तिने यापूर्वी ग्रेट ग्रँड मस्ती, हसीना पारकर, बारात कंपनी, जंक्शन वाराणसी अश्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.

दुसरीकडे जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाकडून बॉलीवूड हिरो चंद्रचूड सिंग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. चंद्रचूड सिंग मुळचा अलिगढचा रहिवासी असून तो बरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल असे सांगितले जात आहे. चंद्रचूड सिंगला राजकारण नवे नाही. त्याचे वडील कॅप्टन बलदेव आमदार होते तर आई राजघराण्यातील आहे. गुलझार यांच्या ‘माचिस’ चित्रपटातील चंद्रचूड सिंगची भूमिका खूप गाजली होती.