इराणची ट्रम्प हत्येची इच्छा व्हिडीओ गेम मधून जाहीर
इराणचे माजी सैन्य जनरल कासीम सुलेमानी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरून केल्या गेलेल्या ड्रोन हल्ल्यात मारले गेल्यानंतर इराणकडून ट्रम्प यांचा बदला घेतला जाणार असल्याचे इच्छा उघडपणे अनेकदा व्यक्त केली जात आहे. यावेळी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खेमेनाई यांच्या वेबसाईटवरून जारी केला गेलेला एक व्हिडीओ तुफान वेगाने सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ट्रम्प यांना गोल्फ क्लबवर ड्रोनच्या हल्ल्यात ठार केले गेल्याचे दाखविले गेले आहे.
या अॅनिमेटेड गेममध्ये जे ड्रोन ट्रम्प यांच्यावर हल्ला करते त्यावर सुलेमान यांचा फोटो दिसतो आहे. डेली मेलच्या बातमीनुसार सुलेमानी यांच्या हत्येला वर्ष झाले त्या निमित्ताने आयोजित केल्या गेलेल्या स्पर्धेचा हा व्हिडीओ एक भाग आहे. जानेवारी २०२० मध्ये बगदाद येथे अमेरिकी ड्रोनने केलेल्या हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. या व्हीडीओचे शीर्षक ‘ रिव्हेंज इन अनएव्हीटेबल’ असे असून त्यात दाखविले गेलेले गोल्फ मैदान फ्लोरिडा येथील आहे.
इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रीयाझी यांनी सुलेमानी यांच्या हत्येबद्दल ट्रम्प यांच्यावर खटला चालविला जावा अशी मागणी अगोदरच केली असून हे न झाल्यास आम्ही बदला घेऊ असे जाहीर केले आहे.