महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सोशल मीडियावरून हटवला महेश मांजरेकरांच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर


वेगवेगळ्या विषयांवर बनवलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. पण महिला आयोगाने या चित्रपटातीत दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवल्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व सोशल मीडिया प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे.


‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट 14 जानेवारीला रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. पण ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह दृष्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या चित्रपटाचा विरोध करत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे. ट्रेलरमध्ये आक्षेपार्ह दृश्य दाखविण्यात आली होती. त्यामुळे महिला आयोगाने या ट्रेलरला विरोध केला आहे. हा ट्रेलर फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर प्रदर्शित करण्यात आला होता. पण आता तो सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे.

महिला आणि लहान मुलांबद्दल वरन भात लोन्चा, कोण नाय कोन्चा या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात आक्षेपार्ह दृष्ये आणि भाषा वापरण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून महिला आयोगाला प्राप्त झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा करण्यास सांगितले आहे. वरन भात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले. त्याचबरोबर या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी होत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमूद केले आहे. याबाबत रूपाली चाकणकर यांनी ट्विट देखील केले आहे.