कोरोनाची तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठीच; इंदुरीकर महाराज


लातूर – पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाचा सामना सध्या संपूर्ण जग करत असून नव्या आव्हानांचा सामना करत आहे. देश सध्या कोरोनाच्या तिसरी लाटेच्या उंबरठ्यावर असून याआधी आलेल्या दोन लाटांमध्ये फार मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अनेकांना आपला जीव दुसऱ्या लाटेत गमवावा लागला होता. दरम्यान दुसऱ्या लाटेतून वाचलो असल्यामुळे तुम्ही आणि आम्ही भाग्यवान आहोत. तुमचा आणि माझा जन्म नाही तर पुनर्जन्म आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले आहे. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलताना त्यांनी तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच असल्याचेही म्हटले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी हसत हसत जगा असा उपदेशही दिला.

(व्हिडीओ सौजन्य – Raja Pandharicha)
ते म्हणाले की, कोरोनामुळे डॉक्टरच गेले, तर हॉस्पिटल कोण चालवेल? हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टर महिन्याला ठेवणारे गेले, असे यावेळी त्यावेळी सांगितली. जर यमाने लाच घेतली असती, तर यमालाही यांनी चेक पाठवला असता. पण यमाने लाच घेतली नसल्याचे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. गाईला पाजलेले पाणी, तुळशीला घातलेले पाणी, वारकऱ्याची आणि काळ्या आईची केलेली सेवा कधी वाया जात नाही. आपण कधीतरी गाईला पाणी पाजले, तुळशीला पाणी घातले आहे, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पाया पडलो. कीर्तनकाराच्या पुढे वाकलो ते पुण्य आपल्याला २०२१ मध्ये कामाला आल्यामुळे हसत हसत जगा. आता भांडणे करण्यात मजा नाही. गळ्यात हात घालून फिरण्याची गरज नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, आता सगळे क्षणिक आहे. उद्याचे किर्तने होईल का याची शाश्वती नाही. आता खोकला का ठोकला, असा जीआरच देवाने काढला आहे. काही लोक खोकला दाबून मेली, पण खोकली नाहीत. त्यामुळे आनंदाने, हसत हसत जगा.

तत्पूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात इंदुरीकर महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात मी लस घेतली नाही आणि घेणारही नसल्याचे वक्तव्य केले होते. गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंतीनिमित्ताने घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. महाविकास आघाडीचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर घेऊन करायचे काय? कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते, तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. येथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला, तर सीतेने डोकावून पाहिले नाही, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले होते.