जागतिक आरोग्य संघटनेने शेअर केलेली कोरोनाबाधितांची जगभरातील धक्कादायक आकडेवारी


वॉशिंग्टन – कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या सावटाखाली सध्या संपूर्ण जग आहे. जगभरात ओमिक्रॉनने आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसागणिक ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट प्रादुर्भावाच्या संख्येत सुमारे 55 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने मंगळवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक अहवालात सांगितले की, गेल्या आठवड्यात कोरोना प्रादुर्भावाची सुमारे 15 दशलक्ष नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर 43,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. पण, अहवालानुसार मृतांची संख्या स्थिर आहे. त्याचवेळी, आफ्रिका वगळता जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढली आहेत. तर आफ्रिकेत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 11 टक्क्यांनी घट झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसियस यांनी सांगितले की, कोरोना प्रादुर्भावाची सुमारे 1.5 कोटी प्रकरणे गेल्या आठवड्यात नोंदवली गेली आहेत, जी एका आठवड्यातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यापैकी बहुतांश लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन डेल्टाची जागा घेताना दिसत आहे. तसेच ज्यांना यापूर्वीच कोरोनाची बाधा झालेली आहे, त्यांना ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा कोरोनाची लागण होत आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी लसीकरण पूर्ण केले आहे, त्यांना कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण होत आहे.

दरम्यान समोर आलेल्या आकडेवारीतून असे स्पष्ट होत आहे की, ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव जगभरात किती वेगाने वाढत आहे. 1 डिसेंबर 2021 रोजी 6 लाख 78 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 1 जानेवारी 2022 रोजी 17 लाख 72 हजार दैनंदिन बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच, 12 जानेवारी 2022 रोजी हा आकडा वाढून जवळपास 28 लाख 46 पर्यंत पोहोचला. म्हणजेच, फक्त 12 दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येत 9 लाखांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या लाटेत सर्वाधिक बाधितांची संख्या 22 एप्रिल 2021 रोजी सुमारे 9 लाख एवढी होती. तर 12 जानेवारी 2022 रोजी कोरोनाबाधितांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. म्हणजेच, गेल्या लाटेच्या तुलनेत तीन पटींनी अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

ओमिक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ओमिक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी काल दिली. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारा त्यांनी दिला. लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनची लागण होत आहे, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.