अयोध्येत योगींच्या विरोधात उभा रहाणार शिवसेनेचा उमेदवार : संजय राऊत


नवी दिल्ली : अयोध्येतून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान शिवसेनादेखील अयोध्येत आपला उमेदवार उभा करणार आहे. शिवसेना मथुरेतून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात 50 ते 100 जागा लढण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

राकेश टिकैत यांना आज भेटणार असून त्यांचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीबाबतचा कल जाणून घेणार आहे. त्यानंतर आम्ही कुठे लढायचे, किती जागांवर लढायचे हे ठरवणार असल्याचे राऊत म्हणाले. उत्तरप्रदेशच्या सर्व भागात आम्ही 50 ते 100 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला आपले आस्तित्व दाखवायचे आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीने लढायचं ठरवले आहे, त्यामुळे आमचे सदस्य उत्तरप्रदेश विधानसभेत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिरासाठी मोठा संघर्ष केला आहे. त्या विषयाला चालना आम्ही दिली. याचे श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये. अयोध्येत, मथुरेत आम्ही निवडणूक लढवणार असून आगामी दोन चार दिवसांनी मी मथुरेत जाणार आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्ही काँग्रेसला म्हटले आहे की, गोव्यात चाळीसपैकी 30 जागा तुम्ही लढा. 10 आम्हाला राष्ट्रवादीला आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला एकत्रितपणे द्या, असा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. आम्ही गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे. एकत्र लढलो नाही, तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नसल्याचे वातावरण असल्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण गोव्यातील स्थानिक नेत्यांना प्रचंड आत्मविश्वास असल्याचे राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत. उत्तर प्रदेशात पहिला टप्पा 10 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा अनुक्रमे 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवार, 3 मार्च आणि 7 मार्चला पार पडणार आहे. निवडणुकांचे निकाल 10 मार्चला येणार आहे.