नितेश राणे अटकेपासून मिळालेला दिलासा सोमवारपर्यंत कायम


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पूर्ण झाली असून सोमवारी न्यायालय यासंबंधी फैसला सुनावणार आहे. हा निकाल येईपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

हा खटला संतोष परब यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी सुरु आहे. पण विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना म्यॉव म्यॉव प्रकरण राज्य सरकारला झोंबल्याने आपल्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा दावा नितेश राणेंच्या वतीने करण्यात आला. त्यावर संतोष परब हल्ला प्रकरण हे त्या आधीचे असून या दोन घटनांचा कोणताही संदर्भ लागत नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून त्यावर सोमवारी न्यायालय आपला निकाल देणार आहे. पण तोपर्यंत आमदार नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.

सतिश सावंत यांच्या पॅनलचे निवडणूक प्रचारक संतोष परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवघेणा हल्ला झाला होता. आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे.

नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी या प्रकरणात आपल्याही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. ज्यात आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा सत्र न्यायालयाने स्वीकारला होता. त्या विरोधात नितेश राणेंसह इतरांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.