दुकानावरील मराठी पाट्यांवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला टोमणा


मुंबई – : राज्य सरकारने काल मंत्रिमंडळ बैठकीत दुकानांवरील मराठी पाट्या लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा लक्षात घेता नियमात दुरुस्ती केली. पण, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच याचे संपूर्ण श्रेय असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचं श्रेय फक्त मनसेच! असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. मनसेने महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले. अनेक केसेस मनसैनिकांनी अंगावर घेतल्या आणि शिक्षाही भोगल्या. त्यामुळे हे श्रेय इतर कुणीही लाटू नये. ते फक्त मनसैनिकांचे आहे, असे पत्रक राज ठाकरेंनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाने काल झालेल्या बैठकीत दुकानांच्या पाट्यांवर सर्वात मोठे नाव मराठीत असले पाहिजे, असा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनी त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच दुकानांच्या फलकांवर मराठी भाषेशिवाय इतर कोणती भाषा नको, असेही त्यांनी सुचवले आहे.

ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरतर आंदोलन करावे लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या, असे म्हणत मनसेने मराठी पाट्यांसाठी केलेल्या आंदोलनाची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली आहे.


ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावे लागूच नये, परंतु 2008, 2009 साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलने केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने काल दुकानांवरील नामफलक मराठीतच असावेत असा निर्णय घेतला, तेव्हा त्याचे श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये. त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच. आणि महाराष्ट्र सरकारचेही अभिनंदन. सरकारला आता मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा.

ह्यात आणखी एक भानगड सरकारने करून ठेवली आहे की मराठी भाषेशिवायही इतर भाषा नामफलकांवर चालतील म्हणून. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे, देवनागरी लिपी सर्वांना समजते. येथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा पुन्हा आम्हाला करायला लावू नका! पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांचं मनःपूर्वक अभिनंदन.