आयुष मंत्रालयाची वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शकतत्वे


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवसे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केंद्र आणि राज्य सरकार या पार्श्वभूमीवर सातत्याने नियमांचे पालन करुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. यामध्ये नागरिकांना कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करता येईल, यासंदर्भातील माहिती आयुष मंत्रालयाने सांगितली आहे.

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. काल दिवसभरात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनबाधितांची संख्या देखील वाढत आहे. आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 5488 रुग्ण आढळल्यामुळे आयुष मंत्रालयाने खबरदारी म्हणून काही मार्गदर्शकतत्वे सांगितली आहेत. आयुष मंत्रालयाने कोरोना होण्यापासून बचावासाठी आयुरक्षा किट कशी असावी याबाबतची माहिती दिली आहे.

त्यानुसार रोज एकदा 6 ग्रॅम चवनप्राश, तर 75ml आयुष काढा दिवसातून एकदा समशामणी वटी 500 मिली ग्रॅम दिवसातून दोनदा, अनुतैला एक ते दोन थेंब प्रत्येक नाकपुडीत दिवसातून एकदा घ्यावा. तसेच कोरोना होण्यापूर्वी गुडुची घनवटी 500 mg दिवसातून दोन वेळा आणि अश्वगंधा 500 mg दिवसातून दोन वेळा घ्यावी.

कोरोना झाल्यानंतर बचावासाठी आयुष 64 हे औषध लक्षणे नसणाऱ्या आणि हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना फायदेशीर आहे. लक्षणे नसलेल्यांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून दोनदा, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. तसेच काबासूर कुडीनीर औषध पाण्यात उकळून घेऊ शकता. ते औषध दिवसातून दोन वेळा 5 ग्रॅम असे घ्यायचे आहे.

होमिओपॅथीद्वारे बचावासाठी आर्सेनिक एल्बुमिन घेता येणार आहे. १३९ स्टडीजच्या आधारे कोरोनावरील उपचाराची ही नवी अॅडव्हायजरी आयुष मंत्रालयाने जारी केली आहे. इम्युनिटी चांगली असल्यास कोरोनाविरोधात लढाई आणखी सोपी होणार असल्याचे आयुष मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, लसीकरण करणे, सकस आकार घेणे, तसेच इतर आरोग्य सेवांशी संबंधित नियमांचे पालन करण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.