कोरोना डिस्चार्ज पॉलिसीत केंद्राकडून मोठा बदल


नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधितांच्या देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशात आता केंद्र सरकारने कोरोनाबाधितांच्या डिस्चार्ज पॉलिसीत बदल केले आहेत. कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम लक्षणे असलेल्यांना पॉझिटीव्ह आल्यानंतर कमीत कमी सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप न आल्यास सुट्टी दिली जाणार आहे. या रुग्णांना डिस्चार्ज आधी कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही. हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोना संदर्भात काल झालेल्या बैठकीनंतर करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले की, मध्यम श्रेणीतील रुग्ण, विना ऑक्सिजन सपोर्ट आणि सतत तीन दिवस 93 टक्क्यांहून अधिक सॅच्युरेशन असलेले रुग्ण कुठल्याही तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी जाऊ शकतात. सतत ऑक्सिजन थेरेपीवर जे रुग्ण आहेत, त्यांनी लक्षणांबाबत समाधान झाल्यावर ऑक्सिजन सपोर्ट विना सलग तीन दिवस राहिल्यानंतर त्यांची क्षमता पाहून त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

अग्रवाल यांनी पुढे म्हटले आहे की, क्लिनिकल रिकव्हरीवर इम्युनोकॉम्प्रोमाइज्डसह अन्य गंभीर प्रकरणातील रुग्णांचा डिस्चार्ज अवलंबून असेल. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडु, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक बाधितांमध्ये वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण लव अग्रवाल यांनी सांगितले आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मते डेल्टावर ओमिक्रॉन हा चांगला उपाय म्हणून समोर येत आहे. दक्षिण आफ्रिका, यूके, कॅनडा, डेन्मार्कच्या तुलनेत भारतात ओमिक्रॉनबाधितांना दवाखान्यात भर्ती करण्याची जास्त गरज पडलेली नाही.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा आज चर्चा करणार आहेत. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सायंकाळी 4.30 वाजता ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सहभागी होणार आहेत. आजारपणानंतर पहिल्या मोठ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होत असल्याने त्यांच्या सहभागाबद्दल उत्सुकता लागली आहे. सध्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.