मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ऐवजी ‘हे’ दोन मंत्री पंतप्रधानांसोबतच्या आजच्या बैठकीत राहणार उपस्थित


मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांनी आज बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला आरोग्याच्या कारणास्तव हजर राहता येणार नसल्याचे कळविण्यात आले आहे. पंतप्रधान आज साडेचार वाजता कोविडसदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील वाढत्या कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा करणार आहेत. या चर्चेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सहभागी होणार नाहीत.

सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. दरम्यान, रविवारी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची परिस्थिती, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली तयारी, देशातील लसीकरण मोहिमेची स्थिती, ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव या सर्वांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा झाली होती.

त्यांनी यावेळी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि मिशन मोडवर प्रौढांसाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी, राज्यांची परिस्थिती, तयारी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावली जाईल, असे त्यांनी सांगितले होते.