मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद लाड यांचा पराभव, तर सिद्धार्थ कांबळे विजयी


मुंबई – भाजपला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षीय निवडीमध्ये भाजपचा धक्कादायकरित्या पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिद्धार्थ कांबळे यांनी आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना पराभूत करत अध्यक्षपद पटकावले. हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवला होता. एकूण २१ जागांपैकी २१ जागांवर दरेकरांच्या पॅनेलचे उमेदवार विजयी झाले होते. पण त्यानंतर सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र ठरवल्यामुळे प्रवीण दरेकर यांना धक्का बसला होता. तसेच त्यांची अध्यक्षपदाची संधी हुकली होती.

दरम्यान भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना आज झालेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा धक्का बसला. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांच्यात सामना झाला. यामध्ये प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली. तर सिद्धार्थ कांबळे यांना ११ मते मिळाली. अशा प्रकारे सिद्धार्थ कांबळे यांचा दोन मतांनी विजय झाला.