छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानियांचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान


मुंबई – मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ज्यात छगन भुजबळांसह कुटुंबियांच्या निर्दोष मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ज्यात पंकज भुजबळ, समीर भुजबळ, देवदत्त मराठे, तन्वीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी यांच्यासह राज्य सरकारलाही प्रतिवादी बनवण्यात आले. लवकरच मुंबई उच्च न्यायालयात तक्रारदार अंजली दमानिया यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान याच प्रकरणात निर्दोष मुक्त झालेल्या विकासक चमणकर यांच्यातर्फे अंजली दमानियांविरोधात उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना सप्टेंबर 2021 मध्ये मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले होते. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयासमोर अर्ज सादर केला होता. यादोघांसह याच प्रकरणातील अन्य आरोपी पंकज भुजबळ, तन्वीर शेख, ईरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही न्यायालयाने दोषमुक्त केले होते. याप्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एसीबीच्या तपास अधिका-यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही न्यायालयाने आपल्या निकालात ठेवला आहे.

भुजबळ यांच्यासह अन्य चौदाजणांविरोधात दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत एसीबीने गुन्हा दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात एक एक करत सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. ज्यात विकासक चमणकर कुटुंबियातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता अरूण देवधर यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.