रॉकेट वैज्ञानिक एस सोमनाथ इस्त्रोचे नवे प्रमुख

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या प्रमुखपदी रॉकेट वैज्ञानिक एस सोमनाथ यांची नियुक्ती केली गेली असून केंद्र सरकारने बुधवारी या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. इस्रो प्रमुख सिवन येत्या शुक्रवारी निवृत्त होत असून त्यानंतर सोमनाथ इस्रोचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सोमनाथ यांनी जीएसएलव्ही एमके थ्री लाँचर विकासात महत्वाची भूमिका बजावली असून करियरच्या सुरवातीला पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल पीएसएलव्ही टीमचे नेतृत्व केले आहे.

एस. सोमनाथ यांची नियुक्ती तीन वर्षासाठी असून अंतराळ विभाग सचिव म्हणून सुद्धा ते काम पाहणार आहेत. त्याचबरोबर अंतराळ आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम करणार आहेत. २२ जानेवारी २०१८ पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र व्हीएसएससीचे निदेशक म्हणून ते काम करत आहेत. इस्रो जगातील अग्रणी अंतराळ संस्थेपैकी एक प्रमुख संस्था आहे.

एस. सोमनाथ हे अतिशय उत्तम वैज्ञानिक आणि रॉकेट टेक्नोलॉजीस्ट आहेत. ते एरोस्पेस इंजिनिअर असून त्यांची ओळख देशातील प्रबळ स्पेस रॉकेट लाँचर विकास कार्यक्रमाला लीड करणाऱ्या मोजक्या वैज्ञानिकातील एक अशी आहे. केरळच्या महाराजा कॉलेज मधून उच्चमाध्यमिक शिक्षण झाल्यवर त्यांनी केरळच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरीग मधून मेकॅनिकल इंजिनिअर पदवी घेतली आणि त्यानंतर एरोस्पेस इंजीनिअरिंग मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.