मकरसंक्रांति- जगभरात १ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार

केंद्रीय आयुष मंत्रालयाने आता भारतीय योगशास्त्राबरोबरच सूर्यनमस्काराला जागतिक पातळीवर नेण्याच्या उद्देशाने यंदा सुरु केलेल्या अभियानाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मकरसंक्रांतिच्या दिवशी जगभरातून १ कोटी लोक सूर्यनमस्कार घालणार आहेत. त्याची सुरवात जपान पासून होणार आहे आणि भारतासह अन्य देशात सकाळी सात वाजता सूर्यनमस्कार घातले जाणार आहेत. केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी व्हर्च्युअली घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या वेळी सोनोवाल म्हणाले, यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्ताने मकर संक्रांति दिवशी किमान ७५ लाख लोकांनी सूर्यनमस्कार अभियानात सामील व्हावे अशी अपेक्षा होती पण जगभरातून या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आता १ कोटी लोक या अभियानात सामील होतील असे संकेत मिळत आहेत.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले सूर्यनमस्कारात आठ आसने येतात. श्वासावर नियंत्रण ठेऊन नमस्कार घातले जातात त्यामुळे ही एक प्रकारची योगिक क्रिया आहे. वैज्ञानिकदृष्टया याचा डिझाईन प्रोग्राम बनविला गेला असून मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध केला गेला आहे. १४ जानेवारीच्या वैश्विक सूर्यनमस्कार कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्याच्या कोविड काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम जास्त योग्य ठरेल. भारतीय योग संस्था, राष्ट्रीय योग खेळ संघ, योग प्रमाणन बोर्ड, फिट इंडिया अश्या अनेक संस्था यासाठी सहकार्य करत आहेत.