मकरसंक्रांत आणि तीळ असे आहे नाते

मकरसंक्रांतिच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते. या दिवशी पवित्र स्नान, दान करण्यचे मोठे महत्व असून या दिवशी तिळाचे सेवन आवर्जून केले जाते. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाने काळ्या आणि पांढऱ्या तिळाची निर्मिती केली असा समज आहे. त्यामुळे तीळ हे सृष्टीतील पहिले अन्न मानले गेले आहे. यामुळे यज्ञ, हवन तिळाशिवाय पूर्ण होत नाही तसेच श्राद्ध पक्षातील तर्पण सुद्धा तिळाशिवाय होऊ शकत नाहीत. तीळ घातलेल्या पाण्याने अंघोळ करणे अतिशय उत्तम मानले जाते.

धर्म पुराणातील कथा सोडल्या तरी आयुर्वेद आणि विज्ञान यांनीही तिळाचे महत्व मान्य केले आहे. तीळ औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे कि, तिळात मोठ्या प्रमाणावर अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आहेत त्याचप्रमाणे कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, मँगनीज, फॉस्फरस, झिंक, बी १ जीवनसत्व आणि मोठ्या प्रमाणावर फायबर आहेत. त्याचे शरीराला अनेक फायदे होतात.

तीळ सेवनाने हाडे मजबूत होतात, सांधेदुखी कमी होते, कॉलेस्टरॉल कमी होते, सर्दी खोकल्यासारखे आजार बरे होतात, रोगप्रतिकार शक्ती, पचन शक्ती वाढते. मात्र तीळ उष्ण असल्याने थंडीत त्यांचे सेवन केले जावे असे आयुर्वेद सांगतो. संक्रांतिचा काळ थंडीचा काळ आहे. थंडीत होणारे अंग फुटणे, सांधेदुखी यावर तीळ सेवन फायदेशीर आहेच पण तीळ तेलाच्या मसाजने शरीरातील आखडलेल्या शिरा आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. तीळ चीरतारुण्य देणारे मानले जातात. यामुळे थंडीच्या दिवसात तीळ सेवन अधिक प्रमाणात करणे फायद्याचे ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही