पाच राज्यातील निवडणुक, टेलीकॉम कंपन्यांची बल्ले बल्ले
देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता रॅलीज, मिरवणुकांवर प्रतिबंध लागला असून करोना मुळे लोक घराबाहेर पडण्यास राजी नाहीत. परिणामी सर्व राजकीय पक्ष इंटरनेटचा आणि सोशल मिडीयाचा दणकून वापर करू लागल्याचे दिसू लागले आहे. इंटरनेट वरील लोड लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. याचा सर्वाधिक फायदा टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्यांना होताना दिसत आहे. या काळात टेलीकॉम कंपन्यांची चांदी होणार असे संकेत मिळू लागले आहेत.
विविध राजकीय दल, त्याचे आयटी सेल आता सक्रीय झाले असून त्याचा परिणाम मोबाईल डेटा खप वाढण्यात झाला आहे. बीएसएनएलच्या रोजच्या डेटा खपात ३८ टक्के वाढ नोंदविली गेली आहेच पण सिम विक्री सुद्धा वाढली आहे. व्हॉटस अप, फेसबुक, ट्वीटर सह अन्य सोशल मिडीयाचा दणकून वापर होत असून मतदारशी संपर्क बरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठी सुद्धा हीच माध्यमे राजकीय पक्ष वापरत आहेत असे दिसत आहे.
निवडणूक घोषणा, आश्वासने या माध्यमातून देण्यात आचारसंहिता भंग नाही. मतदारांशी संपर्क न करताही प्रचार शिवाय करोना संक्रमणाची भीती नाही असा याचा दुहेरी फायदा राजकीय पक्षांना होतो आहे. बीएसएनएल, एअरटेल, व्होडाफोन, जिओ कंपन्यांचा डेटा खप वाढला आहे आणि सिम विक्री मध्ये सुद्धा २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. आगामी काही काळात यामुळे कंपन्या चांगला नफा कमावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.