आयपीएल स्पॉन्सरशिप मधून टाटाना हा फायदा होणार
आयपीएलची स्पॉन्सरशिप चीनी मोबाईल कंपनी विवो कडून आता देशातील अग्रणी उद्योगसमूह टाटा यांच्याकडे आली आहे. त्यामुळे आता आयपीएल विवो ऐवजी टाटा आयपीएल म्हटली जाईल. या स्पॉन्सरशिप मधून टाटाला नक्की काय मिळणार याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
टाटाला या स्पॉन्सरशिप मधून सर्वात मोठा फायदा, देशाच्या नव्हे, तर जगभरात जेथे जेथे आयपीएल लोकप्रिय आहे त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात आपला ब्रांड पोहोचविण्यासाठी होणार आहे. मीठा पासून ट्रक पर्यंत अनेक उत्पादने टाटा कारखान्यात तयार होतात शिवाय त्यांचे हॉटेल, विमान कंपनी असेही अनेक उद्योग आहेत. देशातील सर्वात जुना उद्योग अशी त्यांची ओळख आहेच पण जगाच्या १०० देशात टाटा व्यवसाय पसरला आहे.
या पूर्वी म्हणजे २००८ पासून पाच कंपन्यांनी आयपीएल स्पॉन्सरशिप घेतली होती. त्यासाठी त्यांनी वर्षाला किती पैसे मोजले याची आकडेवारी सांगते की २००८ मध्ये प्रथम डीएलएफ ने वर्षाला ४० कोटी मोजून आयपीएल स्पॉन्सरशिप घेतली होती. त्यानंतर २०१३ ते १५ या काळात पेप्सीने दरवर्षाला ७९ कोटी रुपये मोजले होते. २०१६-१७ विवोने १०० कोटी तर पुन्हा २०१८-१९ मध्ये ४३९ कोटी दिले होते. २०२० मध्ये ड्रीम ११ ने २२२ कोटी तर २०२१ मध्ये विवोने पुन्हा ४३९ कोटी दिले होते. टाटा कंपनी सुद्धा साधारण वर्षाला ४३९ कोटी आयपीएल स्पॉन्सरशिप पोटी देईल असे सांगितले जात आहे.
विवोने आयपीएल स्पॉन्सरशिप घेतल्यावर कंपनी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंकेत एकदम प्रसिद्ध झाली आणि घराघरात पोहोचली आहे. त्यापूर्वी सहारा ग्रुपने सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून अशीच जागतिक लोकप्रियता मिळविली होती. टाटा कडून बीसीसीआयला १३० कोटींचा फायदा मिळणार असे बोलले जात आहे.