ओमिक्रॉन व्हेरिएंटचा जिनोम सिक्वेसिंग अहवाल आता दोन दिवसांत मिळणार


नागपूर : कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाला असल्याचे ओळखण्यासाठी जीनोम सिक्वेंसिंगची आवश्यकता असते. या जीनोम सिक्वेंसिंगला बरेच दिवस लागतात. पण ही जीनोम सिक्वेंसिंग आता केवळ दोन दिवसात होणार आहे. जीनोम सिक्वेंसिंगची नवी पद्धत शोधण्यात नागपूरमधील स्वदेशी निरी संशोधन संस्थेने यश मिळवले आहे. जीनोम सिक्वेंसिंगचा अहवाल या नव्या पद्धतीमुळे दोन दिवसांत उपलब्ध होणार आहे.

जिनोम सिक्वेसिंगसाठी नव्या पद्धतीचा अवलंब नागपूरच्या निरी संशोधन संस्थेने केला आहे. देशातील संशोधन क्षेत्रातील अग्रणी मानल्या जाणाऱ्या निरी ह्या संस्थेने स्वॅब न घेता गारगलच्या माध्यमातून टेस्ट करण्याची पद्धत यशस्वी करून दाखवली. आता ह्याच गारगलच्या माध्यमातून घेतलेल्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग करण्यात येत आहे, आधी ज्यासाठी नमुने हैदराबादच्या प्रयोग शाळेत पाठवावा लागायचे. आरटीपीसीआर टेस्ट सॅम्पल प्रक्रियेतील सलाईन गारगलच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर 53 सॅम्पलची चाचणी करण्यात आली. त्यात 51 नमुने हे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या कोरोना व्हायरस संसर्गाचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य आहे.