उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम; महाबळेश्वरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद


महाबळेश्वर : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा परिणाम दिसून येत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरला आहे. मध्यरात्री वेण्णा लेक परिसरात शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर वेण्णा लेकवर सकाळी सहा वाजता एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत वेण्णा लेकवर तापमान तब्बल चार अंशांनी घसरले आहे. तापमान शून्य अंशांवर आल्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू गोठल्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.

दरम्यान नंदुरबारमध्येही पारा घसरला असून थंडीमुळे ग्रामीण भागात दवबिंदू गोठल्याचे चित्र आहे. दुर्गम भागातील पाड्यांवर बोचऱ्या थंडीत साधनांची वानवा असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. अवकाळी पावसासह गारपिटीचा जोर नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळाला. गारपिटीचा तडाखा रामटेक तालुक्याला बसला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

थंडीचा कडाका नंदुरबार जिल्ह्यातही जाणवत आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. दुर्गम भागात थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या नंदुरबारच्या तोरणमाळ येथे पारा सात अंशावर घसरला आहे. तेथील यशवंत तलाव आणि इतर परिसर ओस पडल्याचे चित्र गेल्या तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

कोरड्या हवामानाची स्थिती राज्यात विदर्भ वगळता अनेक भागात आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमानात दोन दिवसांपासून मोठी घट झाली. नांदेड, वाशिम, सोलापूर, महाबळेश्वर येथे किमान तापमान सरासरीखाली आहे. मराठवाड्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.