शास्त्रज्ञांनी वर्तवली ओमिक्रॉनमुक्त झालेल्यांना ‘ब्रेन फॉग’चा धोका असल्याची शक्यता


नवी दिल्ली – ओमिक्रॉन व्हेरिएंटला गांभीर्याने न घेणाऱ्या आणि बेफिकीरीने वागणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ‘ब्रेन फॉग’चा धोका ओमिक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये संभावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ब्रेन फॉग हे लक्षण कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांमध्ये दिसले होते. पण आता ओमिक्रॉनची लागण झालेल्यांमध्ये ब्रेन फॉग दिसून आले आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्यांमध्ये ब्रेन फॉगशिवाय अन्य काही गंभीर लक्षणंही दिसून आली आहेत. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रक्तात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आल्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयाची रक्ताभिसरण क्षमता घटत असल्याचे दिसून आले आहे. तसेच फुफ्फुसे आणि किडन्यांची कार्यक्षमता 2-3 टक्क्यांनी घटण्याची तज्ज्ञांना भीती असल्यामुळे ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका, याची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण किंवा तीव्र लक्षणे दिसत नसली, तरी ओमिक्रॉनमुक्त झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी सिम्पटम्स गंभीर असण्याची शक्यता आहे.

‘द डेली एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामध्ये दिसणारे दुर्मिळ लक्षण ब्रेन फॉग ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्येही पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी ब्रेन फॉग या समस्येचा सामना करत असल्याचे सांगितले आहे. ब्रेन फॉग या लक्षणाबाबत तज्ज्ञांना ऑक्टोबर 2020 मध्ये पहिल्यांदा माहिती मिळाली होती. ब्रेन फॉग हे लक्षण कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर दिसले होते. परंतु हे लक्षण सर्वच रुग्णांमध्ये न दिसल्यामुळे ताप, थंडी, श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा शरीरात दिसणाऱ्या अन्य लक्षणांमध्ये याचा समावेश करण्यात आला नव्हता. पण आता ओमिक्रॉन बाधितांमध्येही हे लक्षण दिसू लागले आहे.