पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींच्या भावाचा भाजपमध्ये प्रवेश!


चंदीगड – निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल १० मार्च रोजी लागणार आहेत. आयोगाने घोषणा केल्यापासूनच नियमानुसार आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय घडामोडींना या पार्श्वभूमीवर वेग आला आहे. एकीकडे मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनीच भाजप सोडून सपामध्ये प्रवेश केला असतानाच दुसरीकडे पंजाबमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांच्या भावानेच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये अवघ्या महिन्याभरावर मतदानाची तारीख आल्यामुळे सर्वच पक्षांनी सीमेलगत असणाऱ्या या संवेदनशील राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. पंजाबच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांत मोठमोठे हादरे देणारे भूकंप झाल्याचे अख्ख्या देशाने पाहिले आहे. नवज्योतसिंग सिद्धूंशी असलेले मतभेत विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले. पण, त्यांच्याशीही मतभेद झाल्यानंतर सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. शेवटी पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करून सिद्धूंची मनधरणी करावी लागली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही दिवसांपूर्वीच पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून अद्याप राजकारण सुरू असून हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यावरून वाद सुरू असतानाच आता पंजाबमध्ये अजून एक राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे चुलत बंधू जसविंदर सिंग धालिवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जसविंदर सिंग यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत चंदीगढमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

१४ फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. एकूण ११७ सदस्यांच्या विधानसभेमध्ये सध्या काँग्रेसकडे बहुमत आहे. पण, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि नव्या पक्षाची स्थापना, तसेच भाजपशी असलेली जवळीक यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.