जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत करता येणार नाही नितेश राणेंना अटक


मुंबई – जोपर्यंत भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिल्यामुळे नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे.

मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांच्यासह अन्य आरोपींनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरूवारी दुपारी 1 वाजता न्यायमूर्ती सी.वी. भडंग यांच्यापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. बुधवारच्या सुनावणीत नितेश राणेंच्यावतीने जेष्ठ वकील नितीन प्रधान यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता उच्च न्यायालयाचे कामकाज सध्या दुपारी 12 ते 3 या वेळेत सुरू असल्यामुळे बुधवारी वेळेअभावी ही सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.

शिवसेनेचे कार्यकर्ते संतोश परब यांच्यावर नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणघुमाळीत झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच असल्याचा दावा करत राज्य सरकारने या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात विरोध केला आहे. ही घटना 8 नोव्हेंबर 2021 ला घडली होती. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून सिंधुदुर्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंना कणकवली पोलीस स्थानकांत बोलावले होते. चार तासांच्या चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आले. पण विधानभवनाच्या पायऱ्यांवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंना ‘म्याँव म्याँव’ करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाल्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीने आणि सरकारचा दबाव असल्यामुळे या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अटकपूर्व अर्जातून केला आहे.