काल दिवसभरात 1 लाख 94 हजाराहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अधिकच गडद होऊ लागले आहे. दरम्यान देशभरातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. काल दिवसभरात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के एवढा झाला आहे. त्याचबरोबर देशभरातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.

कोरोनारीमुळे आतापर्यंत देशात एकूण 4 लाख 84 हजार 655 जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाच्या या वेगात लसीकरण मोहीम मोठ्या जोमात सुरू आहे. देशात आतापर्यंत 153 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, देशात सोमवारपासून 60 वर्षांवरील व्यक्ती आणि इतर आजारांनी ग्रस्त आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर असलेल्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून दोन दिवसात 52 हजार 611 लोकांना बूस्टर डोस देण्यात आला. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 15-18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना 2 कोटी 81 लाख 780 डोस देण्यात आले आहेत.