मधुर भांडारकरांनी लॉकडाऊनवर बनवलेल्या चित्रपटावरही निर्बंधांचे सावट


मधुर भांडारकर यांची हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यांनी ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’ यासारखे वेगळ्या विषयांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मधुर भांडारकर हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या रिलीजबद्दल फार चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात वाढत्या कोरोनाबाधितांची थेट परिणाम हा मनोरंजन क्षेत्रावर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये मधुर भांडारकर यांचा इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित करावा याबद्दल अत्यंत गांभीर्याने ते विचार करताना दिसत आहेत.

हिंदुस्तान टाईम्सला मधुर भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे बंद झाली आहेत. जर्सी आणि इतर अनेक चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. पणया परिस्थितीमुळे त्यांना आता पुन्हा एकदा धक्का बसला आहे. यानंतर आता आपण काय करावे? असा प्रश्न त्याला पडला आहे. तसेच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावा का? असाही प्रश्न त्यांना पडला आहे. चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर सूर्यवंशी आणि पुष्पा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकजण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत होते. चित्रपटांना चांगला प्रतिसादही देत होते. पण कोरोनामुळे पुन्हा चिंता वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मधुर भांडारकर पुढे म्हणाले की, राज्यातील रेस्टॉरंट, मंदिर आणि बाकीची धार्मिक स्थळ सर्व उघडली आहेत. पण त्यानंतर अचानक चित्रपटसृष्टीला मोठा ब्रेक लागला आहे. आम्ही हळूहळू पुन्हा रुळावर येऊ, अशी मला आशा आहे. दरम्यान सध्या आम्ही आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याबद्दल थोडा विचार करत आहोत. आम्हाला जेव्हा योग्य मार्ग मिळेल, तेव्हा आम्ही चित्रपट प्रदर्शित करू. त्यावेळी समोर दुसरा मोठा चित्रपट असला, तर संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. याचीही आम्ही काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. मधुर भांडारकरचा ‘इंडिया लॉकडाऊन’ हा चित्रपट पहिल्या लॉकडाऊनवर आधारित आहे. प्रतिक बब्बर, आहाना कुमरा आणि श्वेता बसू प्रसाद हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत.