पिंपरी-चिंचवडमध्ये 11 दिवसांत एक हजार मुले कोरोनाबाधित


पुणे – एका गटाकडून शाळा सुरुच ठेवाव्यात यासाठी जोर लावला जात आहे. पण कोरोनाच्या कचाट्यात येणाऱ्या लहान मुलांची आकडेवारीकडे ही त्यांनी लक्ष द्यायला हवे. कारण अवघ्या अकरा दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये एक हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यात सुदैवाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला केवळ चार मुलांनाच पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना ही सौम्य लक्षण आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांना कोरोनावर मात देखील केली आहे.

1023 कोरोनाबाधित मुले गेल्या अकरा दिवसांत पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आहेत. पाच वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांची शाळा ही ऑनलाईनच सुरू होती. पण 6 ते 18 वयोगटातील सर्वच मुलांच्या शाळा या ऑफलाईन सुरू होत्या. हे पाहता वरील आकडेवारी आणखी चिंता निर्माण करते. कारण ऑनलाईन ज्यांची शाळा सुरू होती, त्या 0 ते 5 वयोगटातील केवळ 166 मुलांनाच कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुतांश हे पालकांच्या संपर्कात आले आहेत. पण 9 जानेवारीपर्यंत ज्यांची शाळा ऑफलाईन होती, त्या 6 ते 18 या वयोगटातील तब्बल 857 मुलांवर कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवाची बाब म्हणजे लहान मुलांसाठी पालिकेने राखीव ठेवलेल्या नवीन जिजामाता रुग्णालयात सध्या केवळ चारच लहान मुले दाखल आहेत आणि त्यांच्यातही सौम्य लक्षणे आढळत आहेत. उर्वरित गृह विलगीकरणात असून अनेकांनी तर कोरोनावर मात देखील केली आहे. हे पाहता शाळा ऑनलाईन सुरू ठेवणे की ऑफलाईन सुरू ठेवणे योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.