भारतातील प्रत्येकाला होणार ओमिक्रॉनची लागण; बूस्टर डोसही थांबवू शकणार नाही प्रादुर्भाव


नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाबाधित सातत्याने वाढत आहेत. तर, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन ज्यामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढले, त्याचा प्रादुर्भावही देशात वाढत असल्यामुळे खबरदारीची पावले उचलत सरकारने १५-१८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. शिवाय आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना लसीचा बूस्टर देण्याची घोषणा केली. पण, लोकांना ओमिक्रॉनची लागण होण्यापासून हा बूस्टर डोस देखील रोखू शकणार नसल्याचे एका आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे.

एनडीटीव्हीशी बोलताना आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीमधील वैज्ञानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जयप्रकाश मुलायल म्हणाले, कोरोना हा आता भयानक आजार राहिलेला नाही. नवीन स्ट्रेनचा प्रभाव खूपच कमी आहे आणि खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत आहे. ओमिक्रॉन हा एक असा आजार आहे, ज्याचा आपण सामना करू शकतो. आपल्यापैकी अनेकांना याची लागण झाल्याचेही कळणार नाही. कदाचित ८० टक्क्यांहून अधिक लोकांना कळणारही नाही की आपल्याला कधी ओमिक्रॉनची लागण झाली, असे त्यांनी सांगितले.

बूस्टर डोसची शिफारस कोणत्याही वैद्यकीय समितीने केलेली नाही, असे सांगून डॉ. मुलीयल म्हणाले, की या रोगाची नैसर्गिक प्रगती ते थांबवणार नाहीत. तसेच त्यांनी लक्षणे नसलेल्या बाधितांच्या जवळच्या लोकांच्या कोरोना चाचणीला विरोध केला आहे. त्यांच्यामते या ओमिक्रॉनचा संसर्ग अवघ्या दोन दिवसांत दुप्पट होत असल्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत बाधित व्यक्तीमुळे अनेक लोक संक्रमित झाली असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करण्याचा फायदा होणार नाही आणि त्यामुळे कोरोनाच्या फैलावात देखील काही फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले.

ते कडक लॉकडाऊनबाबत म्हणाले की, जास्त काळ आपण घरात कोंडून राहू शकत नाही. असेही ओमिक्रॉनचा प्रभाव डेल्टा प्रकारापेक्षा खूपच सौम्य आहे. शिवाय सुरुवातीला लस देशात येईपर्यंत सुमारे ८५% भारतीयांना संसर्ग झाला होता. अशा परिस्थितीत, लसीचा पहिला डोस हा पहिल्या बूस्टर डोससारखा होता, कारण बहुतेक भारतीयांमध्ये नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती होती, असे त्यांनी सांगितले.