समाजवादी पक्षात दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी


लखनऊ – ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमधील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. सुलतानपूरच्या न्यायालयाने हे वॉरंट धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी जारी केले आहे. मौर्य यांना न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे २०१४ मध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यांनी ज्यामध्ये म्हटले होते की, लग्नात गौरी-गणेशाची पूजा करू नये. मनुवादी व्यवस्थेतील दलित व मागासवर्गीयांची दिशाभूल करून त्यांना गुलाम बनविण्याचा हा डाव आहे. याप्रकरणी बुधवारी स्वामी प्रसाद मौर्य न्यायालयात हजर न राहिल्यामुळे अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले. आता या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख २४ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आला आहे, हा योगायोग मानला जाईल. उत्तर प्रदेशातील ओबीसींचा मौर्य हे मोठा चेहरा मानला जातो. इतर मागासवर्गीयांचे प्रभावशाली नेते आणि पाच वेळा आमदार राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी मायावतींची बसपा सोडल्यानंतर 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा सामना करण्यासाठी ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याच्या भाजपच्या योजनेत ते केंद्रस्थानी होते.