उत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एका मंत्र्याचा भाजपला रामराम


लखनऊ – उत्तर प्रदेशातील योगी सरकारला विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक झटका बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर उत्तर प्रदेश सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. चौहान हे सुद्धा स्वामींप्रमाणेच ओबीसी समाजातील होते.

राज्यपालांना आपल्या राजीनाम्यासंदर्भात वन आणि पशु फलोत्पादन मंत्री दारा सिंह चौहान यांनी पत्र पाठवले आहे. मी माझ्या विभागाच्या भल्यासाठी मनापासून काम केले, पण योगी सरकारच्या मागासलेल्या, दलित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांप्रती घोर उपेक्षित वृत्तीसोबतच मागासलेल्या, दलितांच्या आरक्षणाबाबत होत असलेल्या गोंधळामुळे मी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देत असल्याचे दारा सिंह चौहान यांनी म्हटले आहे.


भाजपमध्ये येण्यापूर्वी स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे दारा सिंह चौहान हे देखील बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते होते. त्यांनी २०१५ मध्ये बसपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी सदस्यत्व दिले होते. ओबीसी मोर्चाचे अध्यक्षही चौहान यांना करण्यात आले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. पण आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांनी दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. कुटुंबातील एखादा सदस्य चुकला तर खूप त्रास होतो. निघालेल्या आदरणीय मान्यवरांना माझी एवढीच विनंती आहे की बुडत्या बोटीवर स्वार झाल्यास नुकसान त्यांचेच होईल. मोठे भाऊ श्री दारा सिंह जी, तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.