हजारोंना जीवदान देणाऱ्या ‘हिरो मगावा’ उंदराने घेतला जगाचा निरोप

मगावा या शौर्यासाठी गोल्ड मेडल मिळविणाऱ्या एकमेव शूर उंदराने जगाचा निरोप घेतला. कंबोडिया मध्ये मगावाने हजारो लोकांचे जीव वाचविण्याचे अभूतपूर्व कार्य केले आणि त्याबद्दल त्याला शौर्य पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला गेला होता. कंबोडिया मध्ये मगावाने अनेक जिवंत बॉम्ब आणि भूसुरुंग वास घेऊन शोधले आणि त्यामुळे हजारो निरपराध लोकांचा जीव वाचला होता.

मेटल डिटेक्टर सारख्या पारंपारिक उपायांपेक्षा मगावा २६ पट अधिक वेगाने स्फोटके शोधीत असे. बेल्जियमची संस्था एपीओपीओ मध्ये मगावाचे प्रशिक्षण झाले होते. ५ वर्षाच्या करियर मध्ये त्याने अनेक साहसी कामगिऱ्या पार पाडल्या. डेली मेलच्या बातमीनुसार ८ वर्षाच्या मगावाने ३८ एकर जमीन भूसुरुंग मुक्त केली होती. या काळात त्याने ७१ भूसुरुंग आणि ३८ न फुटलेले पण जिवंत बॉम्ब शोधून काढले होते. या विशालकाय आफ्रिकी उंदराने गेल्या आठवड्यात जगाचा निरोप घेतला. शेवटपर्यंत त्याची तब्येत चांगली होती पण त्याने खाणे पिणे सोडले होते असे त्याची हँडलर मोएन हिने सांगितले. एक चांगला सहकारी गमावला असेही ती म्हणाली.

एका टेनिस कोर्टएवढ्या मैदानात मगावा ३० मिनिटात बॉम्बचा शोध घेऊ शकत असे. मेटल डीक्टेटरला हे काम करायला चार दिवस लागतात. गेल्या सप्टेंबर मध्ये मगावाला भूसुरुंग आणि बॉम्ब शोध कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते. त्याला हिरो रॅट म्हणत असत. त्याचे वजन कमी असल्याने तो भूसुरुंग असलेल्या जागी उभा राहून जमीन उकरत असे. या वर्षी जून मध्ये त्याला निवृत्त केले गेले होते. गतवर्षी बहादुरी साठी ‘पीपुल्स डीस्पेंसरी फोर सिक अॅनिमल’ पुरस्कार त्याला दिला गेला होता आणि सोशल मिडीयावर त्यावर खूप प्रतिक्रिया आल्या होत्या. हे पदक जॉर्ज क्रॉस आणि व्हिक्टोरिया क्रॉसच्या तोडीचे मानले जाते. हे गोल्ड मेडल मिळविणारा तो पहिला उंदीर आहे.