विक्की कतरिना प्रथमच पडद्यावर एकत्र येणार
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या विवाहाच्या बातम्या जोरदार गाजल्या. अनेक दिवस त्याचे फोटो, समारंभ वर्णन, उपस्थित पाहुणे, जेवणाचे मेनू यांची चर्चा होत राहिली. विक्की, कतरिना, मुंबईतील त्यांच्या भाड्याने घेतलेल्या, नव्या घरात राहायला आल्याच्या बातम्या सुद्धा आल्या. विवाह बंधनाने हे दोघे एकत्र आले असले तरी अजून चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलेले नाही. पण त्यांच्या चाहत्यांना आता त्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचे वृत्त आहे.
बॉलीवूड मधील जानामाना दिग्दर्शक फरहान अख्तर मुळे हे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे फरहानच्या आगामी ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा पूर्वीच झाली असून त्यात कतरिना मुख्य भूमिकेत होतीच. पण आता विक्की कौशलला सुद्धा या चित्रपट लीड रोल दिला जाणार असल्याचे बॉलीवूड हंगामातील बातमीत म्हटले आहे. कोविड मुळे या चित्रपटाचे शुटींग रखडले आहे. विक्कीला भूमिकेची ऑफर दिली गेली असली तरी विक्कीने त्यासाठी अजून होकार दिलेला नाही असे समजते. पण विक्की हि भूमिका नक्कीच स्वीकारेल असे सांगितले जात आहे. कतरिना विक्की विवाहानंतर या चित्रपटातील मेन रोल विक्कीला देण्याची कल्पना फारच योग्य असल्याचे मत जाणकार नोंदवीत आहेत. कारण चित्रपट प्रमोशन साठी हे दोघे एकत्र बाहेर पडतील तेव्हा त्यांचे चाहते नक्कीच हा चित्रपट डोक्यावर घेतील असे म्हटले जात आहे.