काशी कोतवाल बाबा भैरव सजले पोलीस वर्दीत

वाराणसी धर्मनगरीचा कोतवाल म्हणून मान असलेला प्रसिध्द बाबा कालभैरव प्रथमच पोलिसी वर्दीमध्ये सजल्याने त्याच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. कालभैरव मंदिरात पुजाऱ्यांनी मूर्तीला पोलीस गणवेश चढविला. डोक्यावर टोपी, छातीवर बिल्ला, डाव्या हातात चांदीचा दंडा आणि उजव्या हातात रजिस्टर अशी सजावट मंदिरात केली गेली. कालभैरवाचे हे रूप पाहण्यासाठी भाविकांची एकाच गर्दी झाली होती.

मंदिराचे पुजारी महंत अनिल दुबे म्हणाले वाराणसीवासीयांची कालभैरवावर अतोनात श्रद्धा आहे. बाबा कालभैरवच्या हातात रजिस्टर आणि पेन असल्याने आता कुणाचीही तक्रार देव ऐकेल अशी भावना भाविकांच्या मनात आहे. देशावर आलेल्या करोना महामारी संकटाची काळजी भैरव घेईल असाही विश्वास भाविकांना वाटतो आहे. पोलीस गणवेश देवाला प्रथमच चढविला गेला असून त्यानंतर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन केले गेले होते. बाबा कालभैरव यांना सर्वांवर दया करा, देशात सुखसमृद्धी येवो, सर्वाना आरोग्य लाभो अशी प्रार्थना केली गेली.

पोलीस वेशातील बाबा कालभैरव चुकीचे वर्तन करणाऱ्यांना नक्कीच सजा देईल असे काही भाविकांनी सांगितले.