जोकोव्हिचच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सुरु झाला तसला व्हिडीओ


सोमवारी ऑस्ट्रेलियन न्यायालयात एरव्ही टेनिस कोर्टावर हुकमत गाजवणारा सर्बियन खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने विजयाची नोंद केली. ऑस्ट्रेलियन सरकारने वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना मागील बुधवारी मेलबर्न येथे दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला होता. पण, सोमवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीचा निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला; पण एक विचित्र प्रकार या सुनावणीदरम्यान घडला आहे. न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असतानाच अचानक पॉर्न व्हिडीओ सुरु झाला.

याबाबत अनेक प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जोकोव्हिचच्या प्रकरणाची एकीकडे व्हर्च्यूअल सुनावणी सुरु होती. एका स्क्रीनवर सुनावणी सुरु असतानाच दुसरीकडे पॉर्न व्हिडीओ सुरु झाला. हे स्ट्रीमिंग मेलबर्नमधील न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या लाइव्ह स्ट्रीमिंगला हायजॅक करुन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जोकोव्हिचच्या प्रकरणाची लाइव्ह सुनावणी त्याला मायक्रोसॉफ्ट टीमच्या लिंकवरुन उपलब्ध करुन देण्यात आलेली. सुनावणीदरम्यान मायक्रोफोन आणि व्हिडीओ सुरु ठेवण्यास न्यायालयाने जोकोव्हिचला परवानगी दिली होती.

यासंदर्भात मेट्रो डॉट को डॉट यूके, आरटी न्यूज आणि फॉक्स स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार अनेकदा लाइव्ह प्रसारणादरम्यान अडचणी आल्या. प्रकरणाची सुनावणी मोठा वाद टाळण्यासाठी नवीन लिंकवरुन प्रसारित करण्यात आली. पण नवीन लिंक दिल्यानंतरही अनेकांनी जुन्या लिंकवर क्लिक करुन सुनावणीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या लिंकवर पॉर्न सुरु असल्याचे दिसले.

ओरिजनल लिंक हॅक करण्यात आल्यामुळेच काहींनी ही लिंक ओपन केली, तेव्हा संगीत ऐकू येऊ लागले. अनेक पत्रकारांनाही सुनावणी नवीन लिंकवर शिफ्ट करण्यात आल्याची कल्पना नसल्यामुळे ते जुन्या लिंकवरुनच प्रसारण पाहत होते. त्यावेळी अचानक पॉर्न व्हिडीओ लागला. यासंदर्भातील माहिती पत्रकारांनी ट्विट करुन दिल्यानंतर न्यायालयाने दुसरी लिंक रद्द करुन प्रसारण पूर्णपणे बंद करण्यास सांगितले.