ओटीटीवर ‘या’ दिवशी रिलीज होणार हिंदी भाषेत ‘पुष्पा’


दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा धमाकेदार अॅक्शन चित्रपट ‘पुष्पा’ रिलीजनंतर बराच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला. त्यानंतर हा चित्रपट ७ जानेवारीला प्राइम व्हिडीओवर तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला. पण हा चित्रपट हिंदी भाषेत अद्याप ओटीटीवर रिलीज करण्यात न आल्यामुळे हिंदी भाषेत हा चित्रपट कधी रिलीज होणार यांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण हा चित्रपट आता लवकरच हिंदी भाषेतही ओटीटीवर रिलीज होणार आहे.

हिंदी भाषेतील ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट जेव्हा ७ जानेवारीला तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये ओटीटीवर रिलीज झाला, तेव्हापासून प्रेक्षक याच्या हिंदी व्हर्जनची आतुरतेने वाट पाहताना दिसत होते. पण आता प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. येत्या १४ जानेवारीला प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट हिंदी भाषेत रिलीज होणार आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता काही राज्यांमध्ये चित्रपटगृह बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक प्रेक्षकही सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटगृहांमध्ये जाणे टाळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ‘पुष्पा’ ओटीटीवर रिलीज होणे ही प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. चित्रपटाच्या कमाईचा चढता आलेख पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची किती लोकप्रियता आहे हे लक्षात येते.

अल्लू अर्जुन सोबतच ‘पुष्पा’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. याशिवाय या चित्रपटात फहद फासिल, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सुकुमार यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हिचे आयटम नंबरही आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.