आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार राष्ट्रवादी काँग्रेस


मुंबई – आगामी काळात देशात उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. संपूर्ण देशाचे याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसही या ५ पैकी ३ राज्यांमध्ये निवडणूक मैदानात उतरणार आहे. याबाबतची माहिती स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली. आम्ही मणिपूरमध्ये एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू. तर गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती, त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली आहे. या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथे काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे. उद्या लखनौमध्ये जागांची वाटप घोषित होईल. आम्ही सर्व पुढील आठवड्यात उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ. उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली असल्याचेही पवारांनी नमूद केले.